गंगापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर ग्रामीण भागात महालगाव साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक सुरू असताना एक अपघात घडला. गंगापूर ते वैजापूर मार्गावर न्यु हायस्कूल व मुक्तानंद महाविद्यालयाच्या समोर ऊस भरलेली ट्रॅक्टरची एक ट्रॉली अचानक रस्त्यावर उलटली. या घटनेत ऊस रस्त्यावर विखुरला गेला; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महालगाव साखर कारखान्यासाठी दोन ट्रॉली भरून ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर गंगापूरहून महालगावकडे जात असताना ही घटना घडली. कारखान्याच्या घाईत व वेगाने ऊस वाहतूक सुरू असताना समोरची ट्रॉली अचानक मागील ट्रॉलीवर आदळून रस्त्यावर कोसळल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक माऊली व चालकांच्या मदतीने रस्त्यावर पडलेला ऊस बाजूला करण्यात आला. सदर घटनेमुळे ऊस वाहतुकीदरम्यान सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.












